01
Dec

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे विविध अहवालांचे दाखले देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत खूप काही सांगत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे आणि हेच वास्तव आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुरतसारख्या उद्योगप्रधान शहरात व्यापारी त्रस्त आहेत. कारखानदारी उद्योग अडचणीत आहे. टेक्सटाईल उद्योगात २० हजार कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नाही, असेही पवार यांनी नमूद केले.

नुकत्याच झालेल्या किटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणाबाबत बोलताना पवार साहेब म्हणाले की, बीटी बियाणे हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. ते बंद करणे हा त्यावरील उपाय नाही. बोंड अळीची क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे बियाणे आणखी चांगले कसे करता येईल, याची खबरदारी घेतली पाहीजे आणि प्रकरणाच्या खोलात जाऊन वस्तूस्थिती तपासली पाहीजे. यासंबंधी सुसंवाद साधून यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी वसंतराव नाईक यांनी कृषीक्षेत्रात दिलेल्या योगादानाचाही त्यांनी न विसरता उल्लेख केला. वसंतराव नेहमी हायब्रिड वाणाबद्दल आग्रही असायचे. संकरीत बियाणाच्या त्यांच्या आग्रहामुळे ज्वारी आणि इतर पिकांचे भरघोस उत्पादन आपल्या देशात झाले, असे त्यांनी नमूद केले.

शेतकरी कर्जमाफीबाबत पवार यांनी पत्रकार परिषदेत रोखठोक मत व्यक्त केले. शेतकरी कर्जमाफी करताना महिला आणि पुरूष असे कर्जदार गट केले असून त्यात महिलांच्या कर्जमाफीला प्राथमिकता देण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील महिलेच्या नावावर कायम कमी कर्ज असते आणि महिला वर्गाच्या नावावर जमिनही कमी असते. त्यामुळे सरकारच्या या उथळ धोरणाचा समाचार घेत या धोरणामुळे मोठा कर्जदार गट कर्जमाफीपासून वंचित राहू शकतो, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.

तसेच, १९८० साली काढलेल्या दिंडी यात्रेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस १ डिसेंबर पासून पायी ‘हल्लाबोल यात्रा’ काढत असून त्यात मी स्वतः सहभागी होणार असल्याचे पवार म्हणाले. हि यात्रा ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.

Previous Post

Leave A Comment