01
Dec

अलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.

राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया मी पाहिली नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

त्यांनी यावेळी बोलताना इतर विषयांवरही भाष्य केले. देशाच्या विकासाचा दर खाली आला आहे. खरे तर देशाचा विकासदर ८ टक्क्यांच्या वर असायला हवा. पण तसे न झाल्यामुळे वास्तव लपवण्यासाठी विकास दाखवण्याचे निकष बदलण्यात येत आहेत. ‘मी लाभार्थी’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीत फार गाजावाजा करण्यात आला आहे, पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अद्यापही कळलेले नाही. तसेच, गोहत्या प्रकरणी केंद्र सरकारने संवेदनशील राहायला हवे. कालही राजस्थानमध्ये एक हत्या घडली आहे. केंद्राने राज्यांना सूचना देऊन या घटना थांबवायला हव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.

गडचिरोलीबाबत बोलताना पवार म्हणाले की हा हैदराबाद आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास व दळणवळणापासून वंचित राहिला होता. इथे विकास करायचा असेल तर फक्त पोलीस दल पुरेसे नसून इतर माध्यमातूनही काम केले जाणे गरजेचे आहे, हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ओळखले व तसे प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री  यांनीही मंत्रिमंडळात अनिल देशमुख असताना सहकार्य केले. या सरकारनेही असे प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. हे चित्र काँग्रेससाठी अनुकूल आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave A Comment