01
Dec

राज्यात यशंवतराव चव्हाण यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करुन देताना खेडयातील आपला कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. राज्याचे भाग्य बदलणाऱ्या कोयना-उजनी प्रकल्पाला दिशा आणि गती देण्याचे काम केले, राज्यपंचवार्षिक योजनांची सुरुवात करुन नियोजनबध्द विकासाची पायाभरणी कशी करता येईल असा प्रयत्न केला, त्याच्यातून राज्यातील वेगवेगळया भागातील सहकार कारखानदारी कशी उभी करता येते हे जाणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी केले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कराड येथे काढले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी कराड येथे त्यांना नतमस्तक होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून केंद्रातील आणि राज्यातील भाजप-सेना या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात केली. कराड येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी आपल्या भाषणात आधुनिक राज्याचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना नतमस्तक होवून त्यांच्या कृतींना आणि स्मृतींना आदरांजली वाहिली.

ग्रामीण भागातील शेतकरी सामाजिक,आर्थिक सक्षम कसा होईल, संपन्न कसा होवू शकतो हे आपल्याला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. राज्यात कृषीविद्यापीठांची स्थापना असेल, साहित्य, संस्कृती, महामंडळ उभारण्याचा निर्णय असो, हे सगळे दूरदृष्टीचे निर्णय यशवंतराव चव्हाणांनी घेतले. हे नवीन पिढीला विसरता येणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

यशवंतरावांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांचे अपूर्ण राहिलेले काम, अपूर्ण राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी अजित पवार यांनी व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा शेवटच्या घटकांपर्यंत पोचवण्याचे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असल्याचे सांगितले.

या #हल्लाबोल आंदोलनाला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करुन करण्यात आली. या आंदोलनामध्ये विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदी नेत्यांसह कराड जिल्हयासह आजुबाजूच्या जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Comment